आषाढी वारीसाठी पुरंदरची आरोग्य यंत्रणा सज्ज; झेंडेवाडी ते निरा पर्यंत तयारीही अंतिम टप्प्यात
मुख्य संपादक हनुमंत वाबळे सह्याद्री माझा::
आषाढी वारीसाठी पुरंदरची आरोग्य यंत्रणा सज्ज; तर झेंडेवाडी ते निरापर्यंत तयारी ही अंतिम टप्प्यात
सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी पायी वारी पालखी सोहळा सुरुवात गुरुवार दि. १९ जून ते रविवार दि. 06 जुलै या कालावधीत पार पडणार आहे. त्यानुसार पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी ते निरा या पालखी मार्गावर आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी पुरंदर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाची तयारी ही अंतिम टप्प्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे यांनी दिली.
वारकऱ्यांना कीटकजन्य आजारांचा त्रास होऊ नये यासाठी झेंडेवाडी ते निरादरम्यान सर्व गावात कीटक शास्त्रीय सर्वेक्षण हे पूर्ण करण्यात आले आहे. सासवड ते जेजुरी या प्रमुख शहरास या मार्गावरील प्रत्येक गावात सर्वेक्षण करून प्रतिबंधक उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत.
पालखी मार्गावरील विहिरीचे शुद्धीकरण करण्यात येणार असून, 264 पाणी नमुने व 29 टीसीएल नमुने तपासणीसाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळा पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. मार्गावरील सर्व हॉटेलची तपासणी करण्यात आली आहे.
झेंडेवाडी, सासवड, जेजुरी, वाल्हे, निरा या प्रमुख मुक्काम स्थळावर व अन्य गावात प्रत्येक दोन किलोमीटर अंतरावर आरोग्य सेवा पथके तैनात करण्यात येणार आहेत, याशिवाय झेंडेवाडी, दिवे, शिवरी, बेलसर फाटा, दौंडज वाल्हे व निरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर 24 तास सेवा देणारी केंद्र कार्यरत असणार आहेत.
सासवड व जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात व वाल्हे, निरा येथील आरोग्य केंद्रात बाह्य अंतर्गत रुग्णसेवा 24 तास उपलब्ध राहणार आहेत. या पालखी सोहळ्यासाठी 11 वैद्यकीय अधिकारी, 25 समुदाय आरोग्य अधिकारी, 7 पुरुष आरोग्य सहाय्यक,4 महिला आरोग्य सहाय्यक, 35 आरोग्य सेवक, 25 आरोग्य सेविका, 5 मिश्रक, 5 शिपाई असे एकूण 148 अधिकारी,
कर्मचारी तैनात असणार आहेत. या पथकाचे समन्वयन हिवताप विभाग प्रमुख प्रकाश चौरे, हिवताप आरोग्य सहाय्यक राहुल टकले व तालुका कार्यालय सहाय्यक शिवाजी भोसकर करत आहेत. पुणे परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॅ राधाकिशन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, गट विकास अधिकारी प्रणोती श्रीमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.






